"महिला सन्मान योजना"- महिलांनो.. ‘लालपरी’तून करा 50% टक्के फ्री प्रवास.

ST Bus News : सरकारच्या घोषणेनंतर तिकिट दरात 50 टक्के सवलत.   

महिलांनो..

‘लालपरी’तून करा 50% टक्के फ्री प्रवास.

 

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने  १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर "महिला सन्मान योजना" म्हणून ओळखले जाणार असून या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे. 

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते.

राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना यंदाच्या अर्थसंकल्पात राबवल्याचे दिसत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर व कोल्हापूर जिल्ह्यात चप्पल क्लस्टर राबवण्यात येणार आहे. तसंच, मुंबईत महिला युनिट मॉलची स्थापना करण्यात येत आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात ४ कोटी महिला- मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, दोन योजना एकत्र करुन शक्तीसदन ही नवीनन योजना लागू करण्यात येणार आहे. शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने ५० वसतीगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे. अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा उपलब्ध करुन देणार.

शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आज हा नव्या सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यावेळी राज्य सरकारने महिलावर्गाला विशेष लक्ष्य करत काही घोषणा केल्या आहेत. तर, लवकरच चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार असल्याचंही म्हटलं आहे. तर, महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवण्यात येणार असून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेतील तिकिटदरात महिलांना आता ५० टक्के सरसकट सवलत दिली जाणार आहे. 


Comments